तर सामाजिक सद्भावना वृध्दींगत होईल - इंजि शिवाजीराजे पाटील बाभळीकर,जमाते इस्लामी हिंद च्या ईद मिलाफ कार्यक्रमास सर्व धर्मीयांची उपस्थिती

नांदेड (अब्दुल साजिद) 
राष्ट्र प्रगतीसाठी राष्ट्रभावना जागृत करणाऱ्या उपक्रमांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युटचे मास्टर कोच तथा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रसिध्द वक्ते व लेखक इंजि शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांनी केले आहे.

मागील पंधरा वर्षांपासून सातत्याने मराठा सेवा संघ, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, शिवास्त्र फाऊंडेशन,भिमालय प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेला सर्वधर्मीय दिवाळी स्नेहमिलन सोहळा असेल किंवा जमाते इस्लामी हिंदचा ईद मिलाप समारंभ असो अथवा लक्ष्यवेध फाऊंडेशनची भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा प्रबोधनाची कार्यशाळा असेल हे सर्व राष्ट्रहितेषी कार्यक्रम देशाची सामाजिक सद्भावना वृध्दींगत करणारे ठरतात. त्यामुळे राष्ट्रभावना जागृत करणाऱ्या उपक्रमांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युटचे मास्टर कोच तथा वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रसिध्द वक्ते व लेखक इंजि शिवाजीराजे पाटील बाभळीकर यांनी केले आहे.       

      जमाते इस्लामी हिंदच्या नांदेड जिल्हा शाखेच्या वतीने कुसुम सभागृहात आयोजित भव्य ईद मिलाप सोहळ्यात जीवनसम्राट इंजि.शिवाजीराजे पाटील बोलत होते.जमाते इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष रियाज उल हसन आमेर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या देखण्या सोहळ्याच्या विचारपीठावर नांदेड जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा पंडितराव कदम,लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बालाजी थोटवे,युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, सामाजिक कार्यकर्ते हरजिंदरसिंग संधू, खदिर शेख,नवाब खान,फारुक शबिबी,आबेद खान, अबरार देशमुख,प्रशिक्षक शिवा बिरकले, ब्रॉडवे एज्युकेशन कन्सल्टन्सीचे संचालक गणेश तिडके, आदी मान्यवर उपस्थित होते. 

रेखा पंडितराव कदम या वेळी बोलताना म्हणाल्या की जगातील कुठलाही धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेष करण्याची शिकवण देत नाही. परधर्माचा आदर ही भारतीयांची परंपरा आहे. बालाजी थोटवे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महामानवांच्या चरित्रातील प्रेरक प्रसंग सांगून सर्व जातीधर्मांनी महामानवांच्या विचांरांचा अवलंब करुन एकोपा राखण्याचे आवाहन केले. 

प्रास्ताविक व अध्यक्षीय समारोपात इस्लाम धर्माची मानवतावादी,समतावादी शिकवण व जमाते इस्लामी हिंदचे गेल्या पंचाहत्तर वर्षातील देशाभिमुख कार्य यावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वधर्मीय उपस्थितांनी लज्जतदार शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. 

अत्यंत ओघवत्या व झंझावाती व्याख्यानाने उपस्थितांची मने जिंकणारे विद्यार्थीहृदयसम्राट इंजि शिवाजीराजे पाटील बाभळीकर पुढे बोलताना म्हणाले की,आपापसातील संवाद तुटल्याने समाज व व्यवस्थेपुढे शेकडो प्रश्न निर्माण झाले आहेत. आनंद हरवत चाललेल्या जगात माणसं हसणं विसरले आहेत. उभ्या जीवनाचाच आनंदोत्सव साजरा करता येणे सहज शक्य आहे ही जीवनसाक्षरता समाजात बिंबविण्यासाठी मराठा सेवा संघ, शिवास्त्र फाऊंडेशन, भिमालय प्रतिष्ठान, लक्ष्यवेध फाऊंडेशन व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये जमाते इस्लामी हिंद व इतर सर्व समविचारी संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन शेवटी प्रेरणापुरुष इंजि शिवाजीराजे पाटील यांनी केले. 
ईद मिलाप सोहळ्याला परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.‌

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसिन खान, आभार प्रदर्शन बरकत उल्ला तर प्रास्ताविक मजीद खान  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सय्यद युनुस,अल्ताफ हुसेन,  अब्दुल सलिम, तय्यब शेख, चॉंद भाई यांनी परिश्रम घेतले.

News Category: 
Basmat

Sharing