राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे १४ हजार कोटी रूपयांचे वीज बिल माफ.!,सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीज पुरवठा - ना.अजितदादा पवार



वसमत (प्रतिनिधी) राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे १४ हजार कोटी रूपयांचे वीज बिल माफ केल्या जात असुन पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्यावेळी शेतकऱ्यांची होणारी बेजारी व अडचण लक्षात घेता एका वर्षात सौर ऊर्जेच्या माध्यमातून कृषी पंपासाठी दिवसा विज पुरवठा केला जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमत येथे जनसन्मान यात्रा व शेतकरी मेळाव्यात बोलताना दिले.
वसमत येथील मयूर मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. राजेश विटेकर सह वसमतचे आ.राजुभैय्या नवघरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा बुधवारी वसमत येथे दाखल झाली.सभेच्या प्रास्ताविकातून स्थानिक आमदार राजू नवघरे यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा सादर केला
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर शेतकरी मेळाव्यात बोलतांना पवार म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबीत आहेत. यामध्ये - वीजेचा प्रश्न सर्वात महत्वाचा असून कधी दिवसा - तर कधी रात्रीच्यावेळी विज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी शेतात पिकांना पाणी
देण्यासाठी जावे लागत आहे. मात्र त्यांची अडचण दूर केली जाणार असून पुढील एक वर्षात शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसा विज पुरवठा केला जाणार आहे.
राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांचे १४ हजार कोटी रूपयांचे वीज बिल माफ होत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
यावेळी पुढे बोलतांना राज्यात लाडकी
बहिण योजनेचे पैसे काढून घेतील अशी अफवा विरोधक पसरवित आहेत मात्र कोणीही मायचा लाल तुमचा एक रूपयाही काढून घेणार नाही. महिलांनी विरोधकांच्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन पवार यांनी या वेळी केले.
या वेळी सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर येऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मगाणी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे ही आमचीही भूमिका असल्याचे स्पष्ट केले.