नदी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नदीचे महत्व लोकांना पटवून द्यावेत- मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

 जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत चला जाणूया नदीला या उपक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 13 : मानवी संस्कृतीचा उगम नदीच्या शेजारीच झाला आहे. त्यामुळे नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. या नदी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नदीचे महत्व लोकांना पटवून देणे, त्यासाठी लोकांचा सहभाग घेऊन नदी जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. 

राज्यातील नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने चला जाणूया नदीला या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने वसमत तालुक्यात आसना नदीच्या पुनर्जीवनासाठी रथयात्रा येणार आहे. राज्यातील 75 नद्यावर एकाच दिवशी नदी यात्रेला सुरुवात झालेली आहे. या यात्रेत नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, सरकारी अधिकारी सहभागी होणार आहेत. नदीला अमृतवाहिनी बनवण्यासाठी नागरिकांना नदी साक्षर करण्याबाबतचा मसुदा तयार करणे, नद्यांचे स्वच्छ आणि मानवी आरोग्य यांची रुपरेषा आखणे, नदीचा तट आणि प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार करणे, अनलॉक क्षेत्राचा अभ्यास करुन कार्यवाही अहवाल सादर करणे हा उद्देश आहे. त्यानिमित्त पूर्वतयारीची बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या अध्यक्षतेखाली दि. 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. 

पुढे बोलताना श्री. दैने म्हणाले, माणसाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. पूर्वी निसर्ग, पाऊस , पाणी आणि माणसं यांचं निसर्गचक्र अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असायचं . पण आता माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गाची अपरिमित हानी केली आहे. त्यामुळे कधी पाऊस कमी तर कधी जास्तीचा होतो त्यामुळे पूर्वी नद्या जशा वाहायच्या त्या वाहने आता थांबल्या आहेत. काही नद्या तर नामशेष झाल्या आहेत. त्यामूळे झाडं जंगल संपत चालले आहे, त्यामुळे पुन्हा माणसांनी एकत्र येऊन नद्यांची झालेली हानी थांबवली पाहिजे. त्यासाठी शासनाने चला जाणू या नदीला हा उपक्रम सुरु केला आहे. आपल्या जिल्ह्यात कयाधू व आसना नदीच्या उगमापासून तर ती नदी जिथपर्यंत वाहते तिथपर्यंत लोकांनी लोक चळवळ उभारली तर या नद्या पुन्हा नैसर्गिकरित्या वाहू लागतील आणि शेती पर्यायाने देशाचा शेतकरी सुखी आयुष्य जगेल. त्यामुळे पूर आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी नद्यांचे पुनर्जीवन करणे महत्वाचे आहे. यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपले योगदान द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

यावेळी  या प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक उगम विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, उप मुख्य कार्यकारी सामान्य अनंतकुमार कुभार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस. एस. उबाळे, जिप बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एल. पी. तांबे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आर. डी. कदम, कृषि विकास अधिकारी एन.आर.कानवडे, समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, कळमनुरीचे गटविकास अधिकारी पी. एस. बोंढारे, वसमतचे गटविकास अधिकारी यु. डी. तोटावाड, हिंगोलीच गटविकास अधिकारी जी. पी. बोथीकर, औंढाचे गटविकास अधिकारी ए. सी. पुरी, सेनगावचे सहायक गटविकास अधिकारी एम. के. कोकाटे, वन परिक्षेत्र अधिकारी आर. बी. शेळके, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक उगम विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी हिंगोली जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारी कयाधू व आसना नदी त्यांचा इतिहास उगम आणि पुनर्जीवन या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.

*****

News Category: 
Prashasan update

Sharing