या वर्षी अनंत चतुर्दशी आणि जश्ने ईद-ए- मिलादुन्नबी एकाच दिवशी ,वसमतच्या मुस्लिम समाजाने घेतलाय एक चांगला निर्णय, मुस्लिम बांधवांचा निर्णय कौतुकास्पद- पो.नि.कदम

वसमत (प्रतिनिधी)
या वर्षी दि 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी व त्याच दिवशी मुस्लिम बांधवांची जश्ने ईद-ए- मिलादुन्नबी येत आहे.हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी 28 सप्टेंबरचा दिवस महत्त्वाचा आहे मात्र सामाजिक एकोप्याने दोन्ही सण साजरे व्हावेत या उद्देशाने मुस्लिम समाजाने दोन दिवसा नंतर म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी जश्ने ईद-ए- मिलादुन्नबी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे 

महाराष्ट्रातील लोकप्रिय  सण गणेशोत्सव येत्या 19 सप्टेंबरपासून सुरु होत आहे.गणेशोत्सवाचे 10 दिवस मोठा उत्साह असतो.10 व्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी वसमत येथे गणेश विसर्जन मिरवणुका निघणार आहेत

त्याच दिवशी जगाला मानवतेचा संदेश देणारे प्रेषित पैगंबर हजरत महोम्मद (सल) यांची जयंती जश्ने ईद-ए- मिलादुन्नबी येत आहे या निमित्त शहरातून भव्य मिरवणूक निघते दोन्ही मिरवणुका दरम्यान हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरतो ही बाब लक्षात घेऊन सामाजिक एकोप्याने दोन्ही उत्सव साजरे व्हावेत या उद्देशाने वसमत येथे शुक्रवारी रात्री जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी  समितीने बैठक घेऊन धर्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत काही बदल केले आहेत यात दि 28 सप्टेंबर रोजी होणारी मिरवणूक व कार्यक्रम 1 ऑक्टोबर रोजी
घेण्याचा निर्णय सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष मोहम्मद अतिख मोहम्मद उस्मान यांनी दिली आहे 

बैठकीत धर्मगुरू सह वसमत चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 

मुस्लिम बांधवांचा निर्णय कौतुकास्पद- कदम

सामाजिक बांधिलकी जोपासत मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या पुढाकाराचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी कौतुक करून सर्वांच्या सहकार्यातून दोन्ही समाजाचे उत्सव शांततेत संपन्न होतील असा विश्वास बैठकीत बोलतांना व्यक्त केला

News Category: 
Basmat

Sharing