नांदेड परिक्षेत्रातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांच्या निर्मूलनासाठी आता हेल्पलाइन 'खबर',पालकमंत्री मा. ना.अतुल सावे यांचे हस्ते शुभारंभ,हेल्पलाइनचा लाभ घ्या -पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप

फेरोज पठाण (संपादक) नांदेड परिक्षेत्रातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आता 'खबर' ही हेल्पलाइन सुरू केली आहे.
दिनांक 15 ऑगस्ट, 2025 रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अतुल सावे यांचे शुभ हस्ते सदर हेल्पलाइनचा शुभारंभ करण्यात आला. 91 50 100 100 असा सदर हेल्पलाइनचा क्रमांक असून, सदर हेल्पलाइनवर नागरिकांना आता आपल्या भागातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांची माहिती सुलभपणे देता येणार आहे.
परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चारही जिल्ह्यांतील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी, यापूर्वी तीन विशेष अभियान राजविण्यात आले असून, यादरम्यान केलेल्या कारवाईत, व्यावसायिकांचे विरोधात एकूण (5617) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 27,57,02,643/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
त्याच प्रमाणे, महत्त्वाचे अवैध व्यावसायिकांचे विरोधात, हद्दपार व एमपीडीए खाली देखील कारवाया करण्यात आल्या आहेत.सध्या परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान सुरू असून, या अंतर्गत गत पंधरावड्यात, अवैध व्यावसायिकांचे विरोधात एकूण (468) कारवाया करून, त्यांच्याकडून 1,97,50,575/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
परिक्षेत्रातील पोलिसांनी अवैध व्यवसाया विरोधातील आपली कारवाई अव्याहतपणे सुरू ठेवली आहे.आपल्या भागातील गैरप्रकार व अवैध व्यवसायांची माहिती, सदर हेल्पलाइन क्रमांक 91 50 100 100 यावर नागरिकांना कॉल करून अथवा व्हाट्सअप चे माध्यमातून देखील देता येणार असून, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती सदर हेल्पलाइनवर देऊन, पोलिसांनी अवैध व्यवसायांचे विरोधात सुरू केलेल्या मोहिमेस, जागरूक नागरिक म्हणून हातभार लावावा, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.