आमदार राजू नवघरे यांच्या प्रयत्नाने उभारल्या जाणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे काम होणार- अजितदादा पवार



आदिवासी गावांना होणारा फायदा विरोधकांना चांगला वाटत नव्हता-जयप्रकाश दांडेगावकर
अजितदादा पवार यांच्या समर्थ पाठबळामुळेच ३२ कोटी रुपय निधीच्या आश्रम शाळेचा प्रश्न मार्गी लागला- राजू नवघरे
फेरोज पठाण (संपादक)
आमदार राजू नवघरे यांच्या प्रयत्नाने ३२ कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या आदिवासी आश्रम शाळेत शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे काम होणार असल्याने आश्रम शाळेसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा निर्धार राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी वसमत विधानसभा मतदारसंघातील शिरडशहापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना केला आहे
वसमत विधानसभा मतदारसंघातील शिरडशहापूर येथे ३२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या आदिवासी मुला मुलींच्या आश्रम शाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.भूमिपूजन समारंभ त्यानंतर शिरडशहापूर येथे शेतकरी मेळावाही पार पडला.
या मेळाव्यास विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री डॉ.जयप्रकाश मुंदडा,आमदार विक्रम काळे, माजी आमदार संतोष टारफे,पंडितराव देशमुख,जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण,अब्दुल हफीज अब्दुल रहेमान,मुनीर पटेल,अजित मगर, सतीश पाचपुते,अनिल पतंगे यांच्यासह महा विकास आघाडीच्या पदाधिकारी व नेत्यांची या वेळी व्यापीठावर उपस्थिती होती
वसमत विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व आमदार राजू नवघरे यांनी आदिवासी आश्रम शाळेसाठी निधी मिळवण्यासाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ३२ कोटी रुपयांचा निधी वसमत विधानसभेतील आश्रमशाळेला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. या आश्रम शाळेत आदिवासी समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल,या आश्रमशाळेमुळे सुदृढ व सुशिक्षित समाज निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले अत्यंत दर्जेदार आश्रम शाळा येथे उभारली जाईल यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा निर्धार त्यांनी या सभेत व्यक्त केला.
अजितदादा पवार यांनी या वेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.महा विकास आघाडीचे सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. शेतकरी व सर्व सामान्यांच्या हितासाठी काम करणारे महाविकास आघाडी सरकार होते मात्र तोडाफोडी करून सत्तांतर झाले आणि शेतकरी हिताचे व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणताच निर्णय सरकारमध्ये होत नसल्याची टीका त्यांनी केली. आमदार राजू नवघरे यांच्या कार्याचा त्यांनी गौरव करताना एवढा प्रचंड शेतकरी मेळावा घेतल्याबद्दल नवघरे यांचे कौतुक केले.
सभेला मार्गदर्शन करताना राष्ट्रीय साखर महासंघ नवी दिल्ली चे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली वसमत विधानसभा व त्या जवळच्या आदिवासी गावांना होणारा फायदा विरोधकांना चांगला वाटत नव्हता म्हणून मुख्यमंत्र्याकडून पत्र घेऊन हा वस्तीग्रह रद्द करण्याचा घाट रचण्यात आला परंतु आमदार राजू नवघरे यांनी लोकशाही मार्गाने सतत पाठपुरावा करत वस्तीग्रह पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न सुरूच ठेवल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून हा वस्तीग्रह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
हे सामान्याचे सरकार नाही सामान्याचे प्रश्न बाजूला सोडून द्यायचे आणि जातीयवाद वाढवायचा मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी ते जातीय प्रश्न उकरून काढतात हे जास्त वेळ चालत नसल्याचे जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले.
अजितदादा पवार यांच्या समर्थ पाठबळामुळेच ३२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला व आश्रम शाळेचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे आमदार राजू नवघरे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. वसमत विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे.या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अद्यावत व सर्व सोयीने युक्त आश्रम शाळा असावी असा आपला मानस होता महाविकास आघाडी सरकारने वसमत मतदार संघासाठी आश्रमशाळा ही मंजूर केली मात्र या आश्रम शाळेला पण खोडा घालण्याचे प्रयत्न झाले. आश्रम शाळेचा निधी इतर कामासाठी वळवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
आम्ही शेतक-यांची मुल आहोत. शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी काम करणारे आहोत. जनतेसाठी काम करणार आणि विकासासाठी निधी खेचून आणणार असल्याचे सांगत अजितदादा पवार यांना मुख्यमंत्रीच्या रुपात पाहण्याची इच्छा असल्याचे मनोगत व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद नोंदवला
यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले संचलन प्रकाश इंगळे यांनी केले यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता