वसमत विधानसभा मतदारसंघातील "त्या" ३२ कोटीच्या विकासकामांना  मार्च अखेरात होणार सुरवात

आमदार राजू भैय्या नवघरे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय

वसमत (प्रतिनिधी) : राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील अर्थसंकल्पात केलेली तसेच प्रशासकीय व  तांत्रिक मान्यता दिलेल्या विकासकामांना शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर सदरील मंजूर विकासकामांना स्थगिती दिली होती. परिणामी या स्थगितीमुळे वसमत मतदारसंघासह राज्यातील विकासकामांना खीळ बसली होती. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात वसमत मतदारसंघाचे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्यासह अंबड तालुका, घनसावंगी  तालुका व जालना तालुका येथील लोकप्रतिनिधींनी औरंगाबादच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अँड संभाजी टोपे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केली होती.

सदरील विकासकामे अर्थसंकल्पात मंजूर झालेली असून दोन्ही सभागृहाच्या तसेच राज्यपाल यांच्या मान्यतेने मंजूर झालेल्या कामांना राज्यघटनेनुसार स्थगिती देता येत नाही अशा प्रकारची बाजू मांडण्यात आली. तसेच राज्य शासनाच्या कार्यपध्दती नुसार कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव होणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेली कामे स्थगित करताना कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही व एका आदेशाव्दारे सदरील कामे स्थगित केली गेली.त्यामुळे मतदारसंघातील विकासकामांना खिळ बसली अशा प्रकारचे निवेदन उच्च न्यायालयामध्ये करण्यात आले.

सदरील रिट याचिकेचा शुक्रवार दि ३ मार्च रोजी निकाल जाहिर करण्यात आला. सुनाणीवेळी बर्याचशा कामावरील स्थगिती उठवल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते.मात्र याचिकाकर्त्यांचे वकील संभाजी टोपे यांनी स्थगिती उठवण्यात आलेली कामे केवळ सत्ताधारी पक्षातील आमदारांची असून विरोधी पक्षातील आमदारांच्या कामावरील स्थगिती कायम असल्याचे खंडपिठासमोर सांगीतले.उच्च न्यायालयाने शिंदे - फडणवीस सरकारने दिलेले स्थगिती आदेश रद्द ठरवत महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली कामे पूर्ववत करावीत व त्या द्रष्टीने निर्णय घ्यावेत असा आदेश दिला. परिणामी आमदार राजू नवघरे यांनी वसमत विधानसभा मतदारसंघासिठी खेचून आणलेले ३२ कोटीच्या विकासकामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यात सार्वजनिक रस्ते, इमारती, पाणी स्तोत्र आदी विकास कामांना मार्च अखेर सुरुवात होईल असे आमदार राजू नवघरे यांनी सांगितले. 
त्याबरोबरच कामे मंजूर असूनही स्थगिती आल्याने नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आता पुर्ववत कामे होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

News Category: 
vidhansabha

Sharing